असे साकारले जातात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स

मालिकेत लवकरच पाहायला मिळणार ज्योतिबा आणि असुर रुधोचन यांच्यातील युद्ध

असे साकारले जातात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. असुरांचा संहार करण्यासाठी ज्योतिबाने अवतारी रुप धारण केलं आहे. हा संहार करताना दाखवले जाणारे युद्धाचे प्रसंग कसे शूट केले जातात याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे युद्धाचे प्रसंग शूट करणं हे संपूर्ण टीमसाठी मोठं आव्हान असतं.

 

ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमसोबतच दिग्दर्शक शैलेश ढेरे आणि नितीन काटकर, सेटवरची तंत्रज्ञ मंडळी, या सीनला भव्यदिव्य रुप देणारे 4 K व्हिज्युअल्स ग्राफिक्स टीम आणि फाईट मास्टर सुरज ढोली यांची प्रचंड मेहनत आहे. पडद्यावर अवघे काही मिनिटं दिसणाऱ्या या सीक्वेन्सची तयारी दोन दिवस आधीपासून सुरु असते.

 

मालिकेतल्या या अ‍ॅक्शन सीक्वेन्सविषयी सांगताना ज्योतिबा म्हणजेच विशाल निकम म्हणाले, ‘आमच्या संपूर्ण टीमसाठी ही मालिका साकारणं म्हणजे एक आव्हान आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये असुर रुधोचन आणि ज्योतिबामध्ये युद्ध होणार आहे. या सीक्वेन्सची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. फाईट मास्टर सुरज ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सीन करत आहोत. लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या पारंपरिक खेळांची कला मला अवगत असल्यामुळे त्याचा सीन करताना खूप फायदा होतो. युद्धाचा हा भव्यदिव्य प्रसंग प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.