भूतांची इच्छापूर्ती : ‘ओह माय घोस्ट’!

भूतांची इच्छापूर्ती : ‘ओह माय घोस्ट’!

आपल्या समाजामध्ये आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा हे वाद सुरूच असतात. त्यातच भुताखेतांवर विश्वास ठेवणारे व अजिबात न ठेवणारे यांच्यातही वाद आहेच. भूत म्हटलं की ते त्रास देणारं अथवा बोबडी वळवणारं असं चित्र सहसा चित्रपटांतून दाखविलं जातं. परंतु भूतं प्रेमळ असतील तर? त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करणारा न सापडल्यामुळे ते त्या अवस्थेत राहत असतील तर? तर, या जर आणि तर च्या गोष्टी विचारात घेऊन लेखक मोहसीन चावडा यांनी अतृप्त इच्छा राहिलेल्या भूतांच्या फॅमिलीला एका अनाथ मुलाच्या गोष्टीत चपखलपणे बसवत ‘ओह माय घोस्ट’ नावाचा चित्रपट लिहिलाय ज्याचे दिग्दर्शन केलंय, वसीम खान यांनी. एखादी विस्फारित गोष्ट ऐकल्यावर वा बघितल्यावर इंग्रजीत येणारी पहिली रिऍक्शन म्हणजे ‘ओह माय गॉड’. आजूबाजूला भूतं बघितल्यावर साहजिकच ‘ओह माय घोस्ट’ ही रिऍक्शन आली तर नवल नाही. ‘ओह माय घोस्ट’ मधून भूतांची इच्छापूर्ती व मुक्ती यावर खेळ असून तो प्रामाणिकपणे मांडला असला तरी अननुभवी दिग्दर्शनामुळे अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. तरीही या चित्रपटातून प्रबोधन नक्कीच होते. नैराश्यावर मात करून आयुष्याला मिठी मारणे केव्हाही उत्तम हा संदेशही यातून अधोरेखित करण्यात आला आहे.  


जग्गू (प्रथमेश परब) हा एक अनाथ मुलगा. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरविलेला, अनाथालयात वाढलेला आणि एकाकी आयुष्य जगणारा. हा जग्गू आयुष्यात रस न उरल्यामुळे आत्महत्येचा सारखा प्रयत्न करीत असतो. खिशात दमडी नसलेला, कर्जबाजारी झालेला जग्गू तीन चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येक वेळी असफल होतो. हसवणुकीचा विषय ठरलेल्या त्याच्या आत्महत्या सफल होतील की असफल यावर गल्लीतले पैजा लावत असतात. त्याला सहानुभूती मिळत असते ती केवळ काजल (काजल शर्मा) ची, जी त्याची, त्याला समजून घेणारी एक सुंदर मैत्रीण व छायाचित्रकार-पत्रकार असते. जग्गूचा आयुष्यावरील विश्वास उडालेला असतो त्यामुळे तो तिच्या प्रेमाला व्युत्क्रमण करत नाही. एके दिवशी मध्यरात्री त्याची झोप मोडते व समोर एक-दोन नव्हे तर चार-चार भूतं उभी ठाकतात. त्याच्याकडे हरवण्यासारखं काहीच नसतं व त्याला तर आयुष्यच संपवायचं असतं म्हणून तो न घाबरता त्यांच्याशी संवाद साधतो. वयस्क, नवरा-बायको व एक मुलगी अशी चार जणांची पारिवारिक भूतांची फॅमिली असते. ते जग्गूला त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला सांगतात. काय असतात त्या इच्छा व त्या जग्गू पूर्ण करू शकेल का? हा प्रश्न दिग्दर्शकाने थरार व विनोद वापरत खेळवत ठेवला आहे.


चित्रपटाची संकल्पना चांगली आहे परंतु मंध्यंतरापूर्वीची पथकथा थोडी संथ वाटते. उत्तरार्ध चांगला वेग पकडतो. दिग्दर्शनात नवखेपणा जाणवतो त्यामुळे चित्रपटाला म्हणावी तशी दिशा मिळत नाही. ‘जॉनर’ च्या कसरतीत हा चित्रपट ना धड हॉरर झालाय ना धड कॉमेडी. दिग्दर्शक वसिम खान बॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटांमधील पलायनवादी व ‘फॉर्म्युला’ प्रसंगात अडकल्यामुळे असे घडले असावे. संवाद काही ठिकाणी चमकदार वाटतात. घरमालकाची व जग्गूची संवाद-जुगलबंदी चेहऱ्यावर हसू आणते. भूतांना भीती वाटते हे भूतांनीच सांगणे, भूतांचे कॅरम खेळणे ई. गोष्टी मनोरंजक वाटून जातात. छायाचित्रण उत्तम असून काही वेगळ्या प्रकारचे अँगल्स इंटरेस्टिंग वाटतात. संगीत ठीकठाक असून पार्श्वसंगीत प्रसंगानुरूप आहे. प्रथमेश परब एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो. कॉमेडी त्याचा हातखंडा आहे आणि भावनिक व नाट्यपूर्ण प्रसंगांत तो आपली अभिनयक्षमता दर्शवितो. त्याने संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. त्याच्यातील व्यक्तिरेखेतील शारीरिक बदल उत्तम रीतीने दर्शविण्यात आले आहेत. नवतारका काजल शर्मा दिसलीय सुंदर आणि अभिनयही छान केलाय. ‘न’ आणि ‘ण’ ची काळजी घेतली तर मराठी चित्रपटसृष्टीला अजून एक देखणी नायिका मिळू शकेल. पंकज विष्णू, कुरुस डेबू (मुन्नाभाई एम बी बी एस फेम), प्रेम गढवी, दिपाली पाटील, अपूर्वा देशपांडे यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. 


‘ओह माय घोस्ट’ च्या निर्मात्यांचे अभिनंदन करायला हवे कारण त्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित करून इतर निर्मात्यांना आशेचा किरण दाखविला आहे. हा चित्रपट प्रथमेश परब च्या चाहत्यांना नक्कीच आवडून जाईल. 

 

रेटिंग : २ १/२ स्टार 

कीर्तीकुमार कदम