पुष्कर आणि अमृताचा ‘वेल डन बेबी’ ओटीटीवर

पुष्कर आणि अमृताचा ‘वेल डन बेबी’ ओटीटीवर
पुष्कर आणि अमृताचा ‘वेल डन बेबी’ ओटीटीवर

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच ‘वेल डन बेबी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहे. तर आज या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याबाबत अमृता आणि पुष्करने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

पुष्कर आणि अमृताने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पुष्करने पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘तेच नाते…तेच ऋणानुबंध.. पुन्हा नव्याने शोधूया. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर. ९ एप्रिलला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहा वेल डन बेबी’. अमृतानेसुद्धा हेच मोशन पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.

वेल डन बेबी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियंका तन्वर यांनी केले असून आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे कथानक आधुनिक काळातील दोन तरूण जोडप्यांवर आधारित आहे जे आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करतात. या कौटुंबिक मनोरंजन चित्रपटात पुष्कर आणि अमृतासोबत वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधवसुद्धा या चित्रपटात एक लक्षवेधी भूमिका साकारत आहेत. लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

वेल डन बेबी या चित्रपटाची दोन वर्षापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये दसऱ्याच्या मुहुर्तावर घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच हा चित्रपट फार चर्चेत आहे. मात्र, त्यानंतर लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. तर आज चित्रपटाची तारीख घोषित करण्यात आल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.