अखेर 'हरिओम'वरील पडदा उठला

मे पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर 'हरिओम'वरील पडदा उठला

काही दिवसांपूर्वी श्रीहरी स्टुडिओ प्रस्तुत 'हरीओम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. मात्र त्यावेळी या पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण त्यातही या चेहऱ्यांवर पडदा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. अखेर या कलाकारांवरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या दोघांच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला दोन उमदे कलाकार मिळणार आहेत. 

हरिओम घाडगे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली असून, ते या सिनेमात मोठ्या भावाची म्हणजेच हरीची भूमिका साकारणार आहेत. तर ओमची भूमिका गौरव कदम साकारणार आहे. गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना शरीरयष्टी घडवण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. 

हरिओम आणि गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात दोघे भावंडांची भूमिका साकारत असल्याने, त्यांच्यातील केमेस्ट्री खरी वाटावी, यासाठी  शूटिंगच्या आधी काही महिने ते एकत्र राहिले. या दरम्यान त्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांच्या डाएटवर, व्यायामावरही लक्ष केंद्रित केले इतकेच नाही तर दोघांनी एकत्र स्वयंपाकही केला. बराच काळ एकत्र व्यतीत केल्यामुळे त्यांच्यात भावनिक नाते  तयार झाले आणि या नात्याचेच प्रतिबिंब प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, रहस्यावर आधारित हा सिनेमा एंटरटेनमेंट पॅकेजचा धमाका असणार आहे. आशिष नेवाळकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी हा चित्रपट साधारण मेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.