'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!
'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे. ‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर विविध नवनवे विषय असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी ७ :०० वाजता नवे भाग आणि पुनर्प्रेक्षेपित सकाळी ६:०० वाजता प्रसारित होतात. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शतकोत्सवी भाग सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रेक्षेपण शनिवारी सकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे. 
“महाराष्ट्रात अनेक थोर संत महात्म्यानी शेकडो वर्षांपासून कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधंनातून परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांनी या कलेचा खुबीने वापर करीत समाजाला साक्षर करण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत युगात हे काम प्रसार माध्यमांच्या हाती आहे. आमच्या “फक्त मराठी वाहिनी’ने 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' ही संकल्पना गेली तीन वर्षे राबवली. संत साहित्य, पुराण कथा, इतिहासातील दाखले देत कीर्तनकार महाराष्ट्रातील घटना, परंपरा ओघवत्या खुमासदार शैलीत कथन करीत असल्याने प्रेक्षकांनी उत्तम साथ दिली आहे”, असे “फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले. 
'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या कार्यक्रमामध्ये अध्यात्मासोबत आपल्या आसपास घडणाऱ्या विविध ज्वलंत विषयांवर भाष्य करीत प्रेक्षकांचे साध्या - सोप्या उदाहरणांद्वारे मनोरंजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार त्यांच्या ओघवत्या शैलीत हे कीर्तन सादर करून प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवत त्यांच्या डोळ्यात अंजन घालीत समाज जागृत करण्याचे महत्वाचे कार्य करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. 
'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या अध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रत्यक्ष चित्रीकरण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झाले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील कीर्तनकारांनी आपली कीर्तने सादर केली आहेत. महाराष्ट्राच्या संत साहित्य, परंपरा त्यातील वैविध्यता यासोबतच दिग्गज कीर्तनकारांच्या सादरीकरणातील वेगळेपण हे या कार्यक्रमाच्या लोकप्रियते मागील एक प्रमुख कारण म्हणता येईल. दिवसेंदिवस हा कार्यक्रम लोकप्रियतेची उंची गाठण्यात यशस्वी होत आहे. “महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आहे आणि ती परंपरा जपणं आणि ती नवीन पिढी पर्यंत पोहोचवणं हा उद्देश ठेऊन ह्या कार्यक्रमाला सुरवात केली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे” असं फक्त मराठी वाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे यांनी सांगितलं.
आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण - उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण अश्या विविध विषयांना या कार्यक्रमात विशेष महत्व देण्यात आले आहे. पुढेही या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण होणार असून महाराष्ट्रातील अभिजात संत साहित्य, मौखिक, अध्यात्मिक कलागुणांनी संपन्न अश्या दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग आणि त्यांचे बहारदार सादरीकरण यामुळे प्रेक्षकांचे सखोल ज्ञानार्जनही होणार आहे. दिग्गज कीर्तनकारांची मधुर वाणी, साधी सोप्पी बोलीभाषा यामुळे प्रेक्षक 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' सोबत एकरूप होतात. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे करीत आहेत. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन मंगेश खरात  यांचे आहे.