मराठी चित्रपटाद्वारे जया बच्चन करणार पदार्पण

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ह्यांच्या चित्रपटातून तब्बल ७ वर्षांनी पुनरागमन

मराठी चित्रपटाद्वारे जया बच्चन करणार पदार्पण

बच्चन कुटुंबीयांची 'माँ' आणि बॉलिवूडची ज्येष्ठ नायिका जया बच्चन तब्बल ७ वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. कभी ख़ुशी कभी गम नंतर जया बच्चन यांनी २०१२ मध्ये रितुपर्ण घोष यांच्या सनग्लास या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांनी मोठ्या पडद्यावरून काही काळ रजा घेतली होती. पण आता त्या आपल्या पुनरागमनासाठी सज्ज होत आहेत.

 


विशेष म्हणजे, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित एका चित्रपटाद्वारे त्या पदार्पणास सज्ज झाल्या असल्याची बातमी बॉली हंगामाने दिली आहे. गजेंद्र आपल्या चित्रपटातील वेगळेपणामुळे ओळखले जातात. विषयांचं वेगळेपण, मांडणीची पद्धत, कलात्मक चित्रीकरण ही त्यांच्या शैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याचं चित्रीकरण मार्चमध्ये सुरु होणार असल्याचं कळतंय.

 

 

अवघ्या २० दिवसांत चित्रीत होणाऱ्या या मराठी चित्रपटात जया यांच्या वाट्याला गजेंद्र यांच्या जादुई बटव्यातून कोणती भूमिका येते हे पाहण्यासाठी मराठी रसिकप्रेक्षकांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टी उत्सुक असणार हे मात्र नक्की!!