सासरे श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत प्रिया झाली भावूक

‘सासरे फक्त म्हणायला, तो मला बाबा पेक्षाही जवळचा'

सासरे श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत प्रिया झाली भावूक
सासरे श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत प्रिया झाली भावूक

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातून अनेक काळ रसिक प्रेक्षकांच्या मनात आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहिनी घालणारे रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे, वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा शंतनू मोघे आणि त्यांची सून प्रिया मराठे यांनी पुढे यशस्वीपणे सुरु ठेवला आहे. त्यांचे ६ मार्च रोजी निधन झाले, प्रियाने त्यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने “सासरे फक्त म्हणायला होता, तो मला बाबा पेक्षाही जवळचा” असे म्हटले आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सासरे श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर करत तिने, “माझा बाबा!' असे म्हंटले आहे. ती पुढे म्हणते  "इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. ‘सासरे’ फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. ‘माझं पीयूडं’, ‘माझं लाडकं’ अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की ‘आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे’ असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुरगळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं." अशी सुरेख आठवण तिने शेअर केली. 

 

 

 

 

पुढे तिने असे म्हणते, "गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्सहच कायम पहिला. "मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे" हे धोरण मानून कश्यातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील."

श्रीकांत मोघे यांच्या जाण्यामुळे मराठी रंगभूमीच्या क्षितिजावरील एक तारा निखळला आहे. ह्या नटसम्राटाची उणीव भरून निघणारी नाही.